शहादा l प्रतिनिधी
अवघ्या सतरा स्वयंसेवकांच्या उपस्थित निर्माण झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सतरा कोटी स्वयंसेवकांचा जगातील सगळ्यात मोठं संघटन तयार झाले आहे. स्वयंसेवकांच्या त्याग आणि बलिदानातून संघाचा हा विस्तार झाल्याचे प्रा. गौरीशंकर धुमाळ यांनी गुढीपाडवा उत्सवात बोलतांना केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहादा शाखेतर्फे गुढीपाडवा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे तालुका संघचालक डॉ. हेमंत सोनी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास कविवर्य बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. आर. एस. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर संस्कृत भारतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. गौरीशंकर धुमाळ प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना प्रा. धुमाळ पुढे म्हणाले की, गुढीपाडवा अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण सण असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने गुढीपाडव्याचे एक आगळेवेगळे महत्त्व आहे. संघाचे संस्थापक व प्रथम सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांचा हा जन्मदिवस आहे. डॉ हेडगेवार स्वातंत्र्यपूर्वकाळात काँग्रेससोबत स्वातंत्र्याच्या विविध आंदोलनात होते. काँग्रेसोबत सत्याग्रहात सहभागी झाल्याने त्यांना दोन वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला होता. वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेसपासून वेगळे होत १९२५ साली विजयादशमीला १७ स्वयंसेवकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपुरात स्थापना केली. त्यानंतरही डॉ हेडगेवार महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील दांडी यात्रेत सहभागी झाले होते. देशभरात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या त्याग आणि बलिदानातून संघ वाढत गेला. आज संघाचे देशभरात आणि देशाबाहेर संघाचे १७ कोटी स्वयंसेवक असल्याचे सांगुन समाजहित आणि राष्ट्रहित जपणारा प्रत्येक घटक हा संघाचा स्वयंसेवक असल्याचे प्रा. धुमाळ यांनी सांगितले. प्रारंभी अन्नपुर्णा लाँन येथून संघाचे सघोष पथसंचलन काढण्यात आले.
यावेळी शहादा तालुका संघचालक डॉ. हेमंत सोनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहादा शहर व शहादा तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. याप्रसंगी डॉ. कांतिलाल टाटिया, हिरालाल बोरदेकर, अजय शर्मा, माजी प्राचार्य सुनील सोमवंशी, रमेश शास्री, प्रा. पुष्कर शास्री, सतीश जोहरी, जयेश देसाई, शिवपाल जांगिड, संजय कासोदेकर, गोरख तांबोळी, दिनेश तांबोळी, संघाचे विविध पदाधिकारी व नागरिक स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रा. स्व. संघ शहादा तालुक्याची नुतन कार्यकारिणी- संघचालक- डाँ हेमंत सोनी, कार्यवाह- तुषार पाटील, सह कार्यवाह- गणेश धाकड, बौध्दिक प्रमुख- कुणाल शिंदे, शारिरीक शिक्षण प्रमुख- संकेत पाटील, महाविद्यालयीन प्रमुख- गोविंदा जोहरी, व्यवस्था प्रमुख- विजय पाटील, प्रचार प्रमुख- दीनानाथ सोनार, संपर्क प्रमुख- सचिन कासोदेकर, कार्यालयीन प्रमुख- एस.आर. गिरासे, सेवा प्रमुख- कृष्णदास पटेल, सहसेवा प्रमुख- ऋषिकेष पटेल, सदभाव प्रमुख- जयेश देसाई, महामार्ग प्रमुख- गौरव जोशी, ग्रामविकास प्रमुख- संजय पाटील, धर्मजागरण प्रमुख- सुभाष कुलावत, समरसता प्रमुख- स्वप्निल जैन








