नंदूरबार l प्रतिनिधी
गेली दोन वर्ष दहावी बोर्ड परीक्षांसाठी कोरोणा संसर्गजन्य रोग अडथळा ठरला होता, परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी बोर्डाच्या परीक्षा जाहीर झाल्या आहे. आज पासून दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी एम. व्ही. कदम यांनी दिली आहे.
यंदाच्या बोर्ड परीक्षेचे विशेष म्हणजे 70 ते 100 गुण असलेल्या पेपरला अर्धा तास जास्त वेळ मिळणार आहे तसेच 40 ते 60 मार्कच्या पेपरला पंधरा मिनिटं अधिकचे मिळणार आहे.
आजपासून सुरू झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यात एकूण 376 शाळा उपकेंद्र म्हणून निर्मिती करण्यात आली. २०२१-२२ वर्षासाठी 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी बोर्डातर्फे आढावा घेऊन परीक्षेसाठी आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहे, तसेच जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जात आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेतच देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षांना मुकावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील तणाव दूर करण्यासाठी स्वतःच्या शाळेतच कोणताही दबाव व झडती न घेता परीक्षां देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती नंदुरबार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांनी दिली आहे.