नंदुरबार l प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने मतदारांविषयी जागरुकता निर्माण करण्याच्यादृष्टीने २५ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीत आयोजित राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत प्रश्नमंजूषा, व्हिडीओ तयार करणे, पोस्टर डिझाईन, गाण्यांची स्पर्धा व घोषवाक्य अशा पाच स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना लाखोंची पारितोषिके वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, सदर स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा. दरम्यान, गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकींग स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धांचे वर्गीकरण संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी या तीन श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर याव्यतिरीक्त प्रत्येक श्रेणीमध्ये विशेष उल्लेखनिय रोख पारितोषिके असतील. गीत स्पर्धेत १ लाखापासून ते ३ हजारापर्यंत, व्हिडीओ मेकींग स्पर्धेत २ लाखापासून ५ हजारापर्यंत तर भित्तीपत्र स्पर्धेसाठी ५० हजारापासून ते ३ हजारापर्यंत, घोषवाक्य स्पर्धेसाठी २० हजारापासून ते २ हजारापर्यंत तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू विजेत्यांना देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेसाठी ‘माझे मत माझे भविष्य’ तसेच ‘एका मताचे सामर्थ्य’ असे विषय आहेत. सदर प्रवेशिक पाठविण्याची मुदत १५ मार्च असून यासाठी मराठी भाषेचा उपयोग करता येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे यांनी केले आहे.