नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील सुभाष नगर येथे एका घराला दुपारी अचानक देवघरातील दिव्यामुळे आग लागली होती.ही घटना समोरच राहणाऱ्या अभिलाषा गावीत या युवतीने बघितल्यावर तात्काळ नवापुर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले अग्निशमनदल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरात सुभाष नगर येथे राहणाऱ्या सुधाकर शंकर सकट यांच्या घरातील देवघरातील लावलेल्या दिव्यामुळे दुपारच्या वेळी अचानक आग लागली होती.घराच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर निघत असल्याने घरातील मंडळी भयभीत झाली.घरासमोरच राहणाऱ्या अभिलाषा गावीत या युवतीने हा प्रकार पाहिला असता तिने तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता नवापूर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाला संपर्क साधला आणि सदर घटनेची माहिती दिली. यावेळी नगरपालिकेचा अग्निशामक पथक वेळेवर दाखल झाल्यानं मोठा अनर्थ टळला.आग आटोक्यात आणण्यासाठी नवापूर अग्निशामक दलाचे फायरमॅन संतोष वाघ, ड्रायव्हर सलीम पठाण यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी शर्तीचे प्रयत्न करत आग विझविण्यात आली असून पुढील अनर्थ टळला. यामुळे घर मालक यांनी अग्निशमन दलाचे आभार देखील मानले.








