नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलातर्फे दि.१ ते १४ जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात आली. यात विनामास्कचे एकूण २ हजार ३४ केसेस करण्यात आल्या असून त्यात एकूण ४ लाख १३ हजार ४०० रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. तर कोविड अनुषंगाने १२४ जणांविरूध्द ७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दि. १ ते १४ जानेवारी या दोन आठवडयात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून कोरोना संदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक पोलीसस्टेशनला ठिकठिकाणी नाकाबंदी व फिक्सपॉंईट लावून विनामास्क कारवाई करून दंड वसुल करण्यात आला तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवरही नाकाबंदी करण्यात आली होती. या कारवाईत नंदुरबार शहर ४५६ कारवाया ९० हजार ९०० रूपये दंड, नंदुरबार तालुका १६४ कारवाया ३२ हजार ८०० दंड, उपनगर पोलीस ठाणे १०० कारवाया २० हजार दंड, नवापूर पोलीस ठाणे १२२ कारवाया ३१ हजार १०० रूपये दंड, विसरवाडी पोलीस ठाणे २१४ कारवाया ४३ हजार ४०० दंड, शहादा पोलीस ठाणे १४६ कारवाया २९ हजार २०० रूपये दंड, सारंगखेडा पोलीस स्टेशन २३० कारवाया ४५हजार ६०० दंड, म्हसावद पोलीस ठाणे १३० कारवाया २६ हजार दंड, धडगांव पोलीस ठाणे ८१ कारवाया १६ हजार २०० दंड, अक्कलकुवा पोलीस ठाणे १८६ कारवाया ३७ हजार ६०० दंड, तळोदा पोलीस ठाणे ११० कारवाया २५ हजार ७०० दंड, मोलगी ७५ कारवाया १५ हजार दंड असे एकूण २०३४ केसेस करण्यात आल्या असून त्यात एकूण १३ लाख १३ हजार ४०० रूपये दंड वसुल करण्यात आला. दरम्यान दि.१ जानेवारी ते१४ जानेवारी या कालावधी पोलीस दलाने जिल्ह्यात रेस्टॉरंट, उपहारगृहे व इतर आस्थापने तपासणी असता त्यात ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त नागरीक आढळून आले. कोविड नियमांचा भंग केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात १२४ जणांविरूध्द ७७ गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. जिल्हाभरात सर्व पोलीस ठाण्याहद्दीत पोलीसांकडून नाकाबंदी करून कडक तपासणी करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे आगामी काळात विवाह सोहळे तसेच सामाजिक / धार्मिक / सांस्कृतिक राजकीय कार्यक्रम / मेळावे / संमेलन या ठिकाणी देखील पोलीसांची करडी नजर असणार आहे . शासनाने दिलेल्या कोविड निर्देशांचा भंग झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल .जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून कोणतीही व्यक्ती मास्कशिवाय प्रवास करतांना आढळल्यास / योग्यरित्या मास्क न घालता आढळल्यास सदर व्यक्तीसह वाहनचालकावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे . तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सिमेवर सुद्धा नाकाबंदी करण्यात आलेली आहे . पहाटे ५ ते रात्री ११ वा . पर्यंत जमावबंदी असल्याने सदर वेळेत ५ किंवा ५ पेक्षा जास्त इसमांनी गटागटाने फिरण्यास मनाई असल्याने तसे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल . तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वा . पावेतो संचारबंदी असल्याने सदर वेळेत कोणीही व्यक्ती अत्यावश्यक कारणाशिवाय फिरतांना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल . जिल्ह्यात एखादी संस्था / आस्थापना ही कोविड अनुरुप वर्तन किंवा मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली किंवा एखाद्या व्यक्तीने संस्थेचा किंवा कोणत्याही आस्थापनाच्या आवारात नियमांचे उल्लंघन करतांना मिळून आल्यास पोलीस व महसूल पथकामार्फत संयुक्त कारवाई करुन सदर संस्था / आस्थापना बंद केली जाईल .वरील प्रमाणे नागरिकांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला व पासपोर्ट मिळणेकामी अडचणी येऊ शकतात . त्यासाठी नागरिकांनी कोविड १ ९ अनुषंगाने शासन निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन पोलीसांना सहकार्य करावे .जिल्ह्यातील नागरीकांनी शासनाने दिलेल्या कोविड नियमांचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिला आहे.








