नंदुरबार | प्रतिनिधी
हर घर नल हर घर जल योजनेअंतर्गत अद्याप नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी न पोहोचलेल्या घरांची ग्रामपंचायत आणि पाडानिहाय माहिती घेण्यात यावी, असे निर्देश खा.डॉ.हिना गावीत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते.
डॉ.गावीत म्हणाल्या, वर्षभरापूर्वी पूर्ण होऊन बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांची माहिती घ्यावी आणि त्यासाठी जबाबदार असणार्यांवर कारवाई करावी. जलजीवन मिशन अंतर्गत तयार करण्यात येणार्या प्रस्तावात योजनेसाठी आवश्यक वीज जोडणीचाही समावेश करण्यात यावा. योजनेची अंमलबजावणी करताना पाण्याचा शाश्वत स्त्रोत आणि इतर तांत्रिक बाबींचाही विचार करण्यात यावा.
ग्रामीण भागात प्लास्टिक कचर्यावर प्रक्रीया करून पुर्नवापराबाबत विचार करण्यात यावा. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यावर भर देण्यात द्यावा. धडगाव तालुक्यातील वीज उपकेंद्राच्या वाहिनीचे काम लवकर पुर्ण करावे आणि त्यासाठी वन विभागाने सहकार्य करावे. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहीरीसाठी मागणीनुसार वीज जोडणी देण्याचे काम करण्यात यावे. सौर विद्युत यंत्रणेतील बिघाड वेळेवर दुरुस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणेने कार्यवाही करावी.
मुद्रा योजनेतर्ंगत गरजु लाभार्थ्यांना त्वरीत कर्ज पुरवठा करावा. जनधन योजनेअंतर्गत १०० टक्के बँक खाते उघडण्यात यावेत. वनपट्टे धारकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच मृद आणि जलसंधारणाचा आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसह केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी मांडलेल्या कल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांची उत्पादने देऊन करण्यात आले.