नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबारातील महाराणा प्रताप पुतळा परिसरात पुरवठा विभागाकडून एका गॅस सर्व्हीसिंगच्या नावाने रिफिलिंगचा व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधिताकडून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्षभरात १२ सिलिंडर एका कार्डावर दिले जातात. नेमक्या याच बाबीचा फायदा घेत गॅस कीटवर चालणाऱ्या वाहनात सिलिंडरमधील गॅस रिफिलिंग करून दिले जाते. यासाठी पेट्रोल,डिझेलच्या तुलनेत कमी पैसा आकारला जातो. सिलिंडर असले तरी कार्ड नसल्याने अनेक ग्राहकांना अव्वाच्या-सव्वा दरात गॅस सिलिंडर घ्यावे लागते. शहरात गॅस घरपोच द्यायला पाहिजे. मात्र अनेकांना गोदामातून सिलिंडर आणण्याचा सल्ला दिला जातो. ऑटोरिक्षाचालक ५० रुपये भाडे घेतो. घरपोच सिलिंडर मागविले तर त्याचे १० रुपये जादाचे द्यावे लागत असल्याचे बोलले जाते. नवीन कनेक्शनसाठीचे दरही कमालीचे वाढविण्यात आले आहे. त्यातच आता काळ्या बाजारात गॅस नियमित उपलब्ध आहे.अवैधरीत्या साठा करून हजारोंची कमाई केली जात आहे. यावर कारवाईची तरतूद आहे. मात्र अशा प्रकारात अपवादानेच होत आहेत. आरटीओ विभागाकडूनही गॅस सिलिंडरवर चालणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात नाही. अनधिकृतरीत्या गॅसकीट लावली असलेली वाहने अनेक आहेत. त्यात घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस रिफिलिंग करून वापरला जातो. मात्र ही बाब दुर्लक्षित केली जात आहे. हॉटेलमध्येसुद्धा गॅस सिलिंडरचा वापर प्रचंड वाढला आहे. यावरही कारवाई होत नाही. सदरची बाब पुरवठा विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
नंदुरबारात गेल्या अनेक महिन्यांपासून गजबजलेल्या बसस्थानक परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा व्यवसाय तेजीत बिनदिक्कतपणे सुरू होता.दरम्यान, पुरवठा विभागाने कधी नव्हे ते संबंधितावर कारवाई करण्याचे धाडस केले.शोएब अब्दुल सत्तार हा नंदुरबारातील महाराणा प्रताप चौकात मस्तान गॅस सर्व्हीस नावाने व्यवसाय करत होता.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तो वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत होता.दि.६ जानेवारी रोजी दुपारी पुरवठा विभागाने धाड टाकली असता अनाधिकृतपणे गॅस सिलेंडरमधील गॅस वाहनात भरतांना आढळून आला.तसेच त्याच्याकडे अवैधरित्या साठवणूक केलेले गॅस सिलेंडर आढळून आलेत.त्याच्याकडून १ लाख ९ हजार २७८ रुपयांचे ४९ गॅस सिलेंडर, ३० हजार रुपयांचे गॅस भरण्याचे मोटार, ८ हजारांचे दोन वजन काटे,दीड लाख रुपये किंमतीची ॲपेरिक्षा असा सुमारे दोन लाख ९७ हजार २७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पुरवठा निरीक्षक रमेश शामसिंग वळवी यांच्या फिर्यादीवरुन संशयित शोएब सत्तार याच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते करत आहेत.








