नंदूरबार l प्रतिनिधी
दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळेत नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांनी मुळ टीईटी प्रमाणपत्र दि.७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने काढले आहेत. गेल्या महिन्यात टीईटीच्या घोटाळयात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक झाल्यानंतर टीईटीचे मुळ प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे ‘सेटींग’ मध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
विभागिय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी, जि. प. आणि प्राथ/माध्य शिक्षण निरिक्षक मुंबई प्रशासन अधिकारी यांची दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकित दिलेल्या सूचनेनुसार दि 13 फेबुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचार्यांची (प्राथमिक व उच्च प्राथमिक माहिती व मूळ प्रमाणपत्रे TET शिक्षक पात्रता प्रमाणपत्र पडताळणी करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक शाळांना शासनातर्फे पत्र पाठविण्यात आले असून सर्व माहिती संबधितांनी 7 जानेवारीपर्यंत देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत प्रमाणपत्र वितरण समक्ष परीक्षा परिषद कार्यालयात (2019 परीक्षेसंदर्भात विभागीय उपसंचालक कार्यालयामार्फत केलेले आहे. या व्यतिरिक्त मुळ प्रमाणपत्रे पोस्टाने, कुरीयरद्वारे किंवा अन्य मार्गाने कार्यालयास प्राप्त झाले असल्यास सदर मूळ प्रमाणपत्रे व अहवाल या कार्यालयास सादर करावा.
सदरची माहिती कालमर्यादित असल्याने दि.7 जानेवारी 2022 पर्यंत समक्ष आपले अधिनिस्त जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयास सादर करावीत. सदर कार्यवाही वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार अतितातडीची असल्याने विलंब होणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निर्देश उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शैलजा दराडे यांनी दिले आहेत.








