तळोदा l वार्ताहर
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खंडित पडलेले संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान दोन वर्षां नंतर शासनाने यंदा पासून पुन्हा सुरू केले असून नंदुरबार येथील समितीने तळोदा तालुक्यातील सहभागी पाच गावांना भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली होती.
ग्रामीण भागातील खेड्यामध्ये स्वच्छता राखावी व गावाच्या विकासात जस्तीस जात गावकऱ्यांच्या सहभाग वाढावा यासाठी गेल्या वीस वर्षांपासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले आहे.साहजिकच या अभियानातून ग्रामीण खेड्यानी देखील स्वच्छतेची कास धरली होती.तथापि गेल्या दिड,दोन वर्षा पासून कोराना या जागतिक महामारीने धुमाकूळ घातल्याने आपसूकच राज्यशासनाने देखील त्याला ब्रेक दिला होता.मात्र कोरोनाची लाट ओसरली नंतर पुन्हा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.त्यानुसार नंदुरबार येथील तालुका स्तरीय संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश वळवी,ग्राम पंचायत विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे,स्वच्छता समन्वयक रितेश पाटील,सचिन करवे यांच्या समितीने शुक्रवारी तळोदा तालुक्यातील रांजणी, मोरवड,गणेश बुधावल,मोड व राणापूर या ग्राम पंचायतीना भेट देवून गावांमधील स्वच्छतेची पाहणी केली.या पाहणीत सदस्यांनी पाणी गुणवत्ता,सार्वजनिक स्वच्छता, गावातील शौचालय, त्यांचा वापर, सांड पाणी व्यवस्थापन,नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर आदी ठिकाणी भेट दिली.त्यानंतर सबंधित ग्रामपंचायतींची प्रशासकीय कामकाज,नावीन्यपूर्ण उपक्रम,पाणीपट्टी, घरपट्टी वसुली,शासकीय निधीच्या खर्च आदी बाबींची तपासणी केली.जवळपास सर्वच ठिकाणी स्वच्छता अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली असल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.त्यांचा सोबत तळोदा पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी रोहिदास सोनवणे हे देखील होते.दरम्यान या समितीचे स्वागत सबंधित ग्राम पंचायती चे ग्रामसेवक मधुकर कापूरे,एम एस शेख,हारसिंग पावरा,संदीप सिरसाले,वी जी बावा यांनी केले होते.








