नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटातील उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक १५० फूट दरीत कोसळली होती.या अपघातात चालक व सहचालकाला स्थानिकांनी गंभीर जखमी अवस्थेत गावकऱ्यांनी बाहेर काढले होते. यात चालकाचा मृत्यू झाला असून सहचालकावर उपचार सुरु आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रदिप गुमान डावर (रा.कुंडलवासा ता.उदेयगढ, मध्यप्रदेश) हा त्याच्या ताब्यातील मालट्रक (जी.जे.०३ बी.डब्ल्यू ५९१३) घेवून श्रीरामपूर ते पिंपळनेरमार्गे नवापूरकडे जात होता. यावेळी चरणमाळ घाट उतरत असतांना घाट वळण रस्त्याकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात मालट्रक चालविल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने मालट्रक रस्त्यावर उलटल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात प्रदिप डावर यांचा मृत्यू झाला तर सहचालकावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, सदरची ट्रक सुमारे १५० फुट दरीत कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले आहे. याबाबत पोशि.प्रतापसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात मयत चालक प्रदिप डावर याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन अधिनियम कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नरेंद्र नाईक करीत आहेत.








