नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर व अक्कलकुवा तालुक्यात दोन लाख ८९ हजारांचे बायोडिझेलसह सव्वादोन लाखांचे वाहन असा एकूण पाच लाख १४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध विसरवाडी व अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे बसस्थानक परिसरात एका ट्रकमधून बायोडिझेल भरले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी विसरवाडी पोलिसांनी शोध घेतला असता एका ट्रकमधून (क्रमांक एम.एच
३९-सी ०३२१ ) बायोडिझेल नळीद्वारे काढले जात असल्याचे लक्षात आले. त्याठिकाणी पोलिसांनी अधिक तपास केला असता ट्रकमध्ये प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये मोठ्या प्रमाणावर बायोडिझेल असल्याचे लक्षात आले. एकूण दोन लाख ३४ हजार ८५० रुपये किमतीचे तीन हजार ५० लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले. याशिवाय दोन लाख २५ हजार रुपयांचा मालट्रक देखील जप्त करण्यात आला.याप्रकरणी गजेंद्र रघुनाथ पाटील, रा. बामणे, ता. शिंदखेडा याच्याविरुद्ध विसरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी प्रवीण आहेर यांनी फिर्याद दिली
आहे.याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक राजेश गावीत करीत आहे.तर दुसऱ्या घटनेत बऱ्हांनपुर-अंकलेश्वर महामार्गावर कवली फाट्यानजीक देखील पोलिसांनी कारवाई केली. एका झाडाच्या अडोशाला फरीद लतीफ खाटीक, रा. खापर हा झाडाच्या अडोशाला प्लॅस्टिक टाकीमधून बायोडिझेल विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून १७ हजार ६०० रुपयांचे २२० लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे मनोज नाईक यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








