नंदूरबार l प्रतिनिधी
पिंपळनेरहून सुरतकडे जाणारा मालवाहू ट्रक चरणमाळ घाटात तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट 150 फूट दरील कोसळला.हा अपघात आज 31 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 वाजे दरम्यान घडला.सुमारे 5 तासापासून अडकलेल्या चालक व सहचालक यांना ट्रक खालून बोरझर गावातील नागरिकांनी बाहेर काढत नवापूर रुग्णालयात दाखल केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे आणि नंदुरबार सीमेवरील चरणमाळ घाटात पिंपळनेरहून सुरतकडे जाणारा मालवाहू ट्रक ( जी.जे.०३, बी. डब्ल्यू ५९ ) तीव्र उतारावरून येताना दोनशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे; या अपघातात चालक व सहचालक दोन्ही ट्रकखाली अडकून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. नवापुर तालुक्यातील बोरझर गावातील पोलीस पाटील भीमा गावित व स्थानिक युवकांच्या मदतीने जखमी चालकांना ट्रक खाली अडकलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यात आले आहे. दोन्ही जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून नवापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. सदर ट्रक पिंपळगाव हुन राजकोट कडे बॉक्स बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्या घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.








