तळोदा | प्रतिनिधी-
तळोदा शहरातील दलित वस्तीतील विकास कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दलित वस्ती समस्यांचे माहेरघर बनल्याबाबतचे निवेदन दलित वस्तीतील नागरिकांकडून मुख्याधिकारी सपना वसावा यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा शहरातील दलित वस्तीत राहणारे नागरिक असून मागील पाच ते सहा वर्षात दलित वस्तीत कोणत्याही प्रकारची ठोस विकास कामे झालेली नाहीत. यामुळे दलित वस्तीत विविध समस्या निर्माण झाल्या असून नगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दलित वस्तीत राहणार्या नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.
दलित वस्तीत वरांहाचा मुक्त संचार वाढला असून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच समाज मंदिर परिसरात देखील नियमित स्वच्छता आवश्यक असून पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. समाज मंदिर समोरील बोअरवेल जवळ सुमारे सात ते बारा फूट खोलीचा खड्डा पडला आहे. हा खड्डा जीवघेणा ठरत असून स्थानिक रहिवाशांनी त्या खड्डावर फरशीचा तुकडा ठेवून झाकला आहे. दलित वस्तीतून जाणारी उघड्या गटारीमुळे व दलित वस्तीला लागून असणार्या सार्वजनिक शौचालयामुळे दलित वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा कचरा व गाळ साचल्याने ही गटार देखील तुंबते. त्यामुळे अधिकच दुर्गंधी पसरते. ही गटार उघड्या स्वरुपात असल्याने डासांसह माशा व जीवघेणा विषारी किड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास दलित वस्तीत राहणार्या नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही नगरपालिकेची असेल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर अनिल पवार, आनंद शिंदे, संदीप जावरे, प्रविण नरभवर, सुनिल नरभवर, सरीता गौसावी, लिलाबाई सुर्यवंशी, मनिषा साठे, कल्पना चित्रकथे, कार्तिक शिंदे, अशोक अहिरे, संभु अहिरे, पुंडलिक तिजवीज, लताबाई तिजवीज, जितू तिजवीज, सुनिता सुरवाडे, कपिल खैरनार, सुभाष शिंदे, वैशाली नरभवर, निर्मला शिंदे, मयुर ब्राम्हणे, रत्ना रामराजे, दिलीप शिंदे, तुषार पानपाटील, मनोज ब्राम्हणे, नरेश ब्राम्हणे, सुनंदा पानपाटील, मुकेश अहिरे, अनिता बेडसे, कुसुमबाई अहिरे, शैलेंद्र अहिरे, गबा अहिरे, दिगंबर अहिरे, राजेश तिजवीज, दशरथ तिजवीज, हरचंद तिजवीज, सिध्दार्थ नरभवर, निखिल केदार, दिपक अहिरे, राहुल बेर्डे, सुमित नरभवर, अमोल वळवी, शरद सावळे, राहुल ब्राम्हणे, कपिल नरभवर, प्रणव नरभवर आदींच्या सह्या आहेत.