नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या आयोजनाबाबत बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे सदस्य तथा नाट्यकर्मी मनोज सोनार हे होते.
गेल्या दहा वर्षापासून जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे सातत्यपूर्ण आयोजन होत आहे. सदर आयोजन गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्यातर्फे राज्यपुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ करण्यात येते. या स्पर्धेत राज्यभरातील नाट्यसंस्था व महाविद्यालये सहभागी होऊन आपला नाट्याविष्कार सादर करीत असतात. मात्र मागच्या वर्षी कोरोना या जागतिक महामारीच्या प्रादुर्भावामुळे सदर स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नाही. या वर्षी मात्र सदर स्पर्धा २६ व २७ फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे या बैठकीदरम्यान नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर व रवींद्र कुलकर्णी यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत आपले विचार मांडले. जिभाऊ करंडकमुळे नंदुरबार जिल्ह्यात नाट्य चळवळ जोमाने उभी राहिली असून या स्पर्धेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील कलावंतांना व रसिकांना विविध नाट्य अविष्कार अनुभवयास मिळत असतात, असे मत मनोज सोनार यांनी व्यक्त केले.
बैठकीत ग.स.बँकेचे संचालक जे.एन.पाटील यांनी जिभाऊ करंडकच्या नियोजनाबाबत आपले मत व्यक्त करीत जिभाऊ करंडक यशस्वी होण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला. यावेळी नाट्यकर्मी तुषार ठाकरे, तुषार सोनवणे यांनी देखील आपले मत व्यक्त केले. बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येतील. तसेच येणार्या स्पर्धकांचे व प्रेक्षकांचे देखील लसीकरणाचे दोन डोस असल्याचे प्रमाणपत्र तपासण्यात येईल असे सर्वानुमते ठरले. यावेळी आयोजक राजेश जाधव, आशिष खैरनार, हर्षल महिरे, सागर कदम, पुरुषोत्तम विसपुते, दिनेश पाटील, चंद्रशेखर सूर्यवंशी, एस.एन.पाटील आदी उपस्थित होते.