नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा-प्रकाशा रस्त्यावर निझर तालुक्यातील वेळावद येथे अंत्यविधी आटोपल्यानंतर दुचाकीने घरी परतत असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात ७२ वर्षीय वृध्द ठार झाल्याची घटना घडली.याप्रकरणी
शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील जुन्या प्रकाशा रस्त्यावरील भागवत गिरधर मराठे व त्यांचे वडील गिरधर नथ्थू मराठे तसेच भागवत मराठे यांचे फुवा देविदास छबा चव्हाण रा.तोरखेडा,ता.शहादा हे निझर तालुक्यातील वेळावद येथून अंत्यविधी आटोपून दुचाकीने (क्र.एमएच ३९ के ९०८१)घरी परतत होते.प्रकाशा-शहादा रस्त्यावर एका हॉटेलजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (क्र. जीजे ०१ डीजे ३२४४)दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.अपघातात देविदास चव्हाण यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.तसेच गिरधर मराठे यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.याबाबत भागवत मराठे यांच्या फिर्यादीवरुन ट्रकचालक रामसिंग कोमलसिंग रावत रा.अहमदाबाद याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४(अ),२७९,३३७, ३३८,४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ.राम वळवी करत आहेत.








