नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरची खरेदीने सव्वा लाख क्विंटल चा टप्पा ओलांडला आहे.यंदा अडीच ते तीन लाख क्विंटल आवक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मिरचीला सध्या अठराशे ते चार हजार पर्यंत दर असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात ओल्या लाल मिरची खरेदीसाठी अव्वल मानल्या जाणाऱ्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा डिसेंबर अखेर १ लाख २५ हजार क्विंटल पेक्षा अधिक मिरची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे ही मिरची पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले उत्पादन व दर मिळत आहे. मार्च अखेरपर्यंत सुरू राहणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अडीच ते तीन लाख क्विंटल आवक होण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा, नंदुरबार या तीन तालुक्यांमध्ये प्रामुख्याने मिरची पिकाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या खरीप हंगामात जवळपास ३ हजार ५२३ हेक्टरवर मिरची पिकाची लागवड केली गेली होती. जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाले असले तरी शेतकऱ्यांच्या मेहनतीने मिरची पिकात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी लगबग आहे. दोन वेळा अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे, तसेच दरवर्षी प्रमाणे मिरची पिकावर येणाऱ्या रोगांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक बोजा असल्याने सध्या मिळणार्या दरांपेक्षा आणखी चांगले दर मिळावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षी पूर्ण हंगामात ८० हजार क्विंटलची आवक झाली होती. यंदा डिसेंबर अखेर पर्यंत दुप्पट मिरचीची आवक झाली आहे. मिरची खरेदी विक्रीतून कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळत आहे. बाजार समितीत सुरुवातीला दर कमी होते, परंतु आता कमीत कमी अठराशे पासून ते ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिरचीच्या दर्जानुसार शेतकऱ्यांना भाव मिळत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ओल्या लाल मिरचीला चांगले दर मिळत आहे, दररोज दोनशे ते अडीचशे वाहनांमधून विक्रीसाठी मिरची बाजार समितीत येत असल्याने आवक मध्ये वाढ झाली आहे. मार्चअखेरपर्यंत अडीच ते तीन लाख क्विंटल आवक येण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातूनही मिरची उत्पादक शेतकरी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत असल्याने यंदा मिरची आवक मध्ये वाढ झाली आहे. आंध्रप्रदेश राज्यातील गुंटूर येथील मिरची खरेदी चे भाव पाहता नंदुरबार येथे शेतकऱ्यांना मिळणारा भाव कमी असल्याने व्यापाऱ्यांनी आणखी चांगले दर मिरची उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.








