बोरद l प्रतिनिधी
बोरद परिसरात दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर आढळून आल्याने ऊस तोड मजूर व रखवालदार यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .
बोरद गावाजवळील लाखापुर फॉरेस्ट रस्त्यातील इमरान इब्राहीम तेली यांच्या सर्वे नंबर ५१० अ मध्ये उसाची लागवड केलेली आहे यांच्या शेतातून ५१० ब मध्ये संजय देविदास पाटील यांच्या उसाच्या शेतात आज रोजी सकाळी १० वाजता बिबट्या जात असताना इम्रान तेली व अजहर सईद तेली यांना दिसला असता त्यांनी गावाकडे पळ काढला तसेच दुपारी १ वाजता अजहर यांच्या सर्वे नंबर ५०३,५०४ मध्ये केळीची लागवड केली आहे.रखवालदार बुध्या ठाकरे व काशा ठाकरे हे केळीला पाणी देत असताना त्यांना अचानक बिबट्या दिसल्याने त्यांनी बोरद गावाकडे धाव घेतली. या शेताच्या परिसरात सातपुडा साखर कारखाना व दुर्गा खांडसरी उद्योग ची ऊसतोड चालू आहे तेथेच मजुरांचा पडाव आहे. त्यामुळे मजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.कारण त्यांना स्वतःसोबतच आपल्या जनावरांनाही जपावे लागत आहे बिबट्या चा दिवसाढवळ्या वावर असल्याने ऊस तोड मजूर ऊस तोडण्यास धजावत नाहीत.त्यामुळे शेतकरी चिंतातुर आहे तसेच परिसरात कापूस वेचणी, हरभऱ्याला पाणी देणे, व केळी कापणी सुरू आहे तसेच लाखापुर, गोंडाळे जुवानी, करडे येथील नागरिक बोरद येथे येण्यास धजावत नाहीत. तसेच रात्रीचा विद्युत पुरवठा असल्याने गव्हाला व हरभऱ्याला पाणी देण्यासाठी शेत मालक किंवा रखवालदार आपल्या शेतात जाण्यास ही घाबरत आहेत. तरी वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बोरद येथील शेतकऱ्यांनी केली आहे.








