नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयातंर्गत ‘खेलो इंडिया’ योजनेतून नंदुरबार येथे खेलो इंडियाचे मैदानी (ॲथलेटिक्स ) खेळ प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले असून प्रशिक्षणासाठी 30 खेळाडूंची निवड करावयाची आहे. यासाठी पात्र खेळाडूंनी 27 डिसेंबर 2021 पर्यंत नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
ॲथलेटिक्स खेळाच्या प्रशिक्षणासाठी 15 मुले व 15 मुलींची निवड केली जाईल. खेळाडूंची निवड शासनाने निर्देशित केलेल्या निवड चाचणीनुसार करण्यात येईल. निवड झालेल्या खेळांडूना आधुनिक पद्धतीने मैदानी (ॲथलेटिक्स ) खेळाचे प्रशिक्षण सकाळ व संध्याकाळ या दोनसत्रामध्ये देण्यात येईल. यासाठी खेळाडूंचे वय 11 ते 18 वर्ष दरम्यान असावे. प्रशिक्षणाचा लाभ घेवू इच्छित खेळाडूंनी आपल्या नावाची नोंद जन्मतारखेच्या दाखल्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात करावी. जिल्ह्यातील शाळा, क्रीडा मंडळे , संघटनांनी पात्र खेळाडूंना सहभागी होण्यासाठी सूचित करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, खामगाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा.








