नंदूरबार | प्रतिनिधी
येथील यात्रेत अश्व बाजारात येण्यासाठी किंवा अश्व बघण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे आहे. अश्व बाजाराच्या प्रवेशद्वारावरच आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे किंवा कसे याची माहिती घेत आहेत. त्यानंतरच आत प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे अश्वप्रेमींनी येथे येण्यापूर्वी लस घेणे आवश्यक आहे. दरम्यान, आज दि.१० रोजी अश्व विक्रेत्यांना लसीकरण करण्यात आले.
शासनाने कोरोना प्रार्दुभावाचे नियम, अटी च्या शर्तीवर अश्व बाजार भरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सारंगखेडा येथे अश्व दाखल होऊ लागले आहेत. त्यांना अश्व बाजारात कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखविल्यावरच प्रवेश देण्यात येणार असल्याने प्रवेश द्वाराजवळ तपासणी केली जात आहे. आज उत्तर प्रदेशातील अश्व मालक, अश्व देखरेख करणार्या १२ जणांना लसीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, गोवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
घोडेबाजाराच्या ठिकाणी बाहेरील राज्यातील घोडे विक्रेता, व्यापारी तसेच खरेदीदार येतात, त्यांचे १०० टक्के लसीकरण व कोविड १९ आरटीपीसीआर चाचणी ही ७२ तासांच्या आत झालेली आहे किंवा नाही ही बाब प्रामुख्याने पडताळणी केल्याशिवाय त्यांना घोडे बाजारात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती चेतक फेस्टीव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली.








