नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडील विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याकडून 15 डिसेंबर 2021 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहे.
ठिंबक सिंचन योजनेसाठी शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा, अर्जदाराचे वार्षिंक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे किंवा अर्जदार दारिद्रयरेषेखालील असावा, लाभार्थ्यांकडे 1 एकर ते 10 एकर शेत जमीन असावी. पाण्याची उपलब्धता असल्याचा दाखला, लाभार्थी ठिंबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असावा तसे संमतीपत्र आवश्यक असेल. विधवा, परितक्त्या स्त्रिया, दिव्यांग यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी विधवा, परितक्त्या, दिव्यांग असल्याचा दाखला आवश्यक राहील. अर्जासोबत जातीचा दाखला, सातबारा उतारा आधार कार्ड, दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) दाखला व प्रमाणपत्र, रहिवास दाखला, बॅक पासबूक अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, ग्रामसभेचा ठराव, तसेच यापुर्वी या योजनाचा लाभ आदिवासी विकास विभाग अथवा अन्य विभागामार्फत न घेतल्याचे प्रमाणपत्र, लाभार्थी साहित्य विक्री करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
योजनेच्या अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.








