नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धा संपन्न होऊन १९ प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद प्रकल्प सादरीकरण स्पर्धा वात्सल्य सेवा समिती व शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रॉफ हायस्कूल येथे दि. २ व ३ डिसेंबर रोजी आयोजित केल्या होत्या. सदर स्पर्धेत १५४ प्रकल्प नोंदणी पैकी ६८ प्रकल्प बाल वैज्ञानिकांनी सादर केले. त्यापैकी एकोणावीस बाल वैज्ञानिकांची राज्य स्तरासाठी निवड करण्यात आली. सदर स्पर्धेचा प्रमाणपत्र वाटप व समारोप कार्यक्रम दि. ५ डिसेंबर रविवार रोजी नंदुरबार नगरपरिषदेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार मधील सुप्रसिद्ध नेत्र शल्यचिकित्सक डॉ अनिल शहा,प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गजानन डांगे, अ.बा. टेंभेकर आदी उपस्थित होते. डॉ. शहा यांनी आपल्या भाषणात आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या संशोधनाची माहिती देऊन समोर बसलेल्या बाल वैज्ञानिकांनी सुद्धा संशोधनाकडे वळावे असे व त्याचा उपयोग समाजासाठी कसा होईल याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. तसेच डॉ. डांगे यांनी आपल्या प्रमुख भाषणात भारतातील शास्वत विज्ञानाची परिस्थिती व नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर देऊन भारताची जागतिक स्तरावर अधिकाधिक प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यावे तसेच वात्सल्य सेवा समितीने महिन्यातून एकदा या बाल वैज्ञानिकांसाठी दालन उघडून शहरातील व देशातील नामांकित संशोधकांशी हितगुज करावे व आपल्या बाल वैज्ञानिक वृत्तीला चालना देण्यासाठी उपक्रम राबवावा असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष वाणी यांनी केले. प्रमाणपत्र वाटप यादी वाचन व आभार प्रदर्शन पंकज पाठक यांनी केले. परीक्षक म्हणून डॉ. जयंती देशपांडे ,प्रा. डॉ.नितीन देवरे, प्रा डॉ. अनिल कुलकर्णी, प्रा. डॉ. सुभाष खैरनार ,कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, कृषी विभागाचे उमेश भदाणे यांनी काम पाहिले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वात्सल्य सेवा समितीचे मंगेश उपासनी, मिलिंद वडनगरे, राजेंद्र मराठे, महेश जोशी यांनी सहकार्य केले.








