नंदुरबार l प्रतिनिधी
खेळाडूंचे मैदानावर असलेले प्रेम व क्रीडा शिक्षकांची असलेली मेहनत यामुळेच नंदुरबार जिल्ह्यात भव्यदिव्य स्वरुपात स्पर्धा होतात. जिल्ह्याचे खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवतात, ही एक अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन नंदुरबार नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष रविंद्र पवार यांनी केले. ते येथील ४५ वी राज्यस्तरीय वरिष्ठगट टेनिक्वाईट अजिंक्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली व नंदुरबार जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनच्यावतीने ४५ वी राज्यस्तरीय वरिष्ठगट टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र पवार व नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी उपसंचालक सुनंदा पाटील म्हणाल्या की, दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर खेळाडू या राज्य स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावर आलेले आहेत. यातूनच खेळाडूंना नवसंजीवनी मिळेल. यासाठी सर्वांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनचे सचिव अनिल वर्पे, मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, उपमुख्याध्यापक राजेश शहा, क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पंकज पाठक, उपाध्यक्ष श्रीराम मोडक, संघटनेचे सचिव प्रा.डॉ.मयुर ठाकरे, धुळे जिल्हा सचिव प्रकाश पाटील, रेफ्री बोर्डाचे चेअरमन मृणाल बांडेबुचे, क्रीडाशिक्षक जगदीश वंजारी आदी उपस्थित होते. स्पर्धेला महाराष्ट्र राज्यातून २१ मुलांचे व १८ मुलींचे असे एकूण ३९ संघातील २३४ खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा मुला-मुलींचा संघ निवडला जाणार आहे. ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचा संघ याच ठिकाणी घोषित होणार आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची निवासाची व भोजनाची व्यवस्था नंदुरबार जिल्हा टेनिक्वाईट संघटनेच्या पदाधिकार्यांकडून करण्यात आली आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी आनंदा मराठे, राजेश्वर चौधरी, भरत चौधरी, अक्षय जेठे, राकेश चौधरी, चेतन जोहरी, धनंजय बोरसे, जितेंद्र पगारे, विशाल पवार, जितेंद्र माळी आदी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर ठाकरे यांनी केले. तर आभार श्रीराम मोडक यांनी मानले.










