शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वाडी पुनर्वसन येथे नदीपात्रात महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित व मध्यप्रदेश निर्मित असलेल्या साडेचारशे बॉक्समधील १० हजार ८०० टिन बियर व तीन चार चाकी वाहने असा सुमारे ३५ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी एका अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली .

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व ठाणे येथील भरारी पथकाला दि .२७ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील वाडी गावाच्या हद्दीतील पुर्नवसनजवळ नदीच्या पात्रात दि . २८ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एका चॉकलेटी रंगाच्या आशयर कंपनीच्या ट्रक ( क्र.एम.एच.१८ एए ०२०४ ) मधून महाराष्ट्र शासनाचा महसूल बडवून मध्यप्रदेश राज्यातून आयात केलेल्या व फक्त मध्यप्रदेश राज्यातच विक्रीकरिता निर्मिती केलेल्या परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेल्या अवैध बिअरसाठ्याची विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या आयात केली जाणार असून तो साठा एका आशयर कंपनीच्या डंपर क्र . ( जी.जे .३४ टी १३१७ ) व पिकअप क्र ( एमएच ०४ एचडी ५७१० ) यामधून महाराष्ट्र राज्यात विविध भागात वितरित करणार असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचण्यात आला . भरारी पथकाचे निरीक्षक एम.बी. चव्हाण , जवान विशाल बस्ताव , प्रविण धवणे , अमोल हिप्परकर असा सहकारी रेडींग स्टाफ व दोन पंच असे सर्वजण मिळून एका खाजगी वाहनाने वाडी गावाचे हद्दीतील पुर्नवसन कोरड्या पोसली नदीच्या पात्रात शोध घेत असताना तीन वाहने उभी दिसून आली . तसेच एका ट्रकमधून दुसऱ्या दोन वाहनांमध्ये माल भरत असल्याचे दिसून आले . पथक आल्याचे समजल्याने बिअरसाठा वाहनात भरणारे सर्वांनी पायवाटेने अंधाराचा फायदा घेत पळ काढला . दरम्यान , पथकाने पाठलाग करुन एका इसमास ताब्यात घेतले . दरम्यान , सदर तीनही वाहनांची पंचासमक्ष दारुबंदी कायद्यांर्गत तपासणी केली असता प्रत्येक वाहनात एकाच आकाराचे खाकी रंगाचे अनेक बॉक्स एकमेकांवर रचलेले दिसून आले . यावेळी ताब्यात घेतलेल्या इसमाच्या व दोन पंचाच्या समक्ष तीनही वाहनांमधील खाकी बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये ५०० मिली क्षमतेचे मध्यप्रदेश निर्मित बिअरचे टिन असल्याचे दिसून आले . ताब्यात घेतलेल्या इसमाकडे घटनास्थळी मिळून आलेल्या मध्यप्रदेश निर्मित बिअर साठ्याबाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली . सदर बिअरसाठा खरेदीच्या पावत्या , परवाना , कागदपत्रे आढळून आले नाहीत . यामुळे याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे जवान व्हि.सी.बस्ताव यांच्या फिर्यादीवरून मगन दखन्या वसावे रा . जीवननगर , वाडीपूर , कुडावद ता.शहादा याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा , १ ९ ४ ९ चे कलम ६५ ( अ ) ( ई ) ८१ , ८३ व ९ ० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करून शहादा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे . पुढील तपास भरारी पथकाचे निरीक्षक एम.बी.चव्हाण करीत आहेत .








