नंदुरबार l प्रतिनिधी
जि.प.आरोग्य विभागातील संवर्गाना पदोन्नती व कालबद्ध पदोन्नती व इतर मागण्यांचे आदेश विधान परिषदेच्या आचार संहिता संपल्यानंतर देण्यात येतील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी महासंघाचे पालक खा. डॉ हिना गावित व आ. डॉ विजयकुमार गावित यांना दिल्याने दोन दिवसांपासून सुरू असलेले आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी सांगितले.
प्रशासनाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने कालबद्ध पदोन्नती नियमित पदोन्नती डीसीपीएस कपातीचा हिशोब प्रॉव्हिडंट फंडाच्या स्लिपा व इतर मागण्या मान्य करून आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने आदेश देऊन इतर मागण्यांची देखील अंमलबजावणी करण्यात येईल तसेच आंदोलनकर्त्यांवर कुठलीही कार्यवाही होणार नाही असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.खा. डॉ हिना गावित यांनी यावेळी सांगितले की, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशासन मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन निश्चितच पाळतील तसेच आ. डॉ विजयकुमार गावित यांनी सांगितले की मागण्यांची अंमलबजावणी करण्या कामी आमचे प्रशासनावर लक्ष राहील. याप्रसंगी जि प सदस्य डॉ. सुप्रिया गावित व महासंघाचे नेते डॉ. कांतिलाल टाटिया हजर होते. उपोषण कर्त्या कर्मचाऱ्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
दोन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हिम्मतील व धैर्याला सलाम करून आंदोलन संपल्याचे वाय.पी.गिरी यांनी सांगितले.आंदोलन यशस्वीततेसाठी रामदास सोनार, राजू परदेशी, विनोद राणे, राजू भाई, नितीन बागुल, विशाल मोघे, सुरेखा वळवी, रेखा बाविस्कर, सरला तिरमले, भावना वळवी, ज्योती संदानशिव यांनी प्रयत्न केले.