नंदुरबार | प्रतिनिधी-
रोजगार हमी योजनेंतर्गत शेतात वृक्ष लागवड करण्यासाठी मजूरांचे मस्टर तयार करुन त्याचे बिल काढून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्विकारणार्या अक्कलकुवा पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यक अधिकारी अभिषेक गोपिचंद नुक्ते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी पंचायत समिती अक्कलकुवा येथे त्यांच्या आईच्या नावे एक एकर शेती आहे. त्या शेतात रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्याकामी पंचायत समिती अक्कलकुवा येथे ऑक्टेबर २०२१ मध्ये अर्ज केला होता. सदर योजना ही तीन वर्षे मुदतीची असून तीन वर्षात अंदाजे ४० हजार रुपये मिळणार आहे. त्या वृक्ष लागवडीस लागलेला मजूरांच्या खर्चाचे मस्टर बील अक्क्लकुवा पंचायत समितीचे तांत्रिक सहायक अधिकारी (रो.ह.यो.) अभिषेक गोपीचंद नुक्ते यांनी तयार करुन तक्रारदारांना पहिला हप्ता २ हजार ९७६ रुपये मजुरांच्या खात्यांवर टाकुन दिला होता. सदर बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात नुक्ते हे तकारदारांकडे ५०० रुपये लाचेची मागणी केलेली होती. सदर रक्कम आज दि.१० नोव्हेंबर २०२१ रोजी पंच व साक्षीदारांसमक्ष पंचायत समितीच्या रेकॉर्ड रुमजवळ स्विकारली असून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी समाधान वाघ, पोहवा उत्तम महाजन, पोहवा विजय ठाकरे, पोहवा विलास पाटील, पोना मनोज अहिरे, पोना अमोल मराठे, पोना चित्ते, मपोना ज्योती पाटील, पोना नावाडेकर, चापोना महाले यांच्या पथकाने केली.








