नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व पदोन्नती मिळावी व इतर मागण्यांसाठी आज होणाऱ्या बेमुदत उपोषण व धरणे आंदोलनात जि.प.प्रशासन फूट पाडण्याच्या प्रयत्न करीत आहे. कर्मचाऱ्यांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आंदोलनात 100 टक्के सहभागी व्हावे असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी केले.
तब्बल १२ वर्षापासून कालबद्ध पदोन्नती नाही व नियमित पदोन्नती, डीसीपीएस जीपीएफ रक्कमेचा हिशोब, नियमाप्रमाणे दरमहा एक तारखेला पगार, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापपावेतो पेन्शन लागू न होणे या इतर मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील जि. प.आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील कर्मचारी बेमुदत उपोषण व धरणे आंदोलनात 100 टक्के सहभागी होणार आहेत.
जि. प.प्रशासन तथ्यहीन फतवे काढून आंदोलनात फूट पाडण्यासाठी घबराटीचे व दहशतीचे वातावरण तयार करत आहे, त्यांच्यावर दबाव आणित आहे. वास्तविक महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा निर्णय क्रमांक – डीईएन-२०१८/ प्र.क्र. १६४/ आस्था-१२ दिनांक १० ऑक्टोबर २०१२ अन्वये स्पष्ट केले आहे की, जि.प.कर्मचाऱ्यांच्या संघटना ह्या श्रमिक संघ अधिनियम१९२६ अंतर्गत स्थापन केल्या पाहिजेत व या संघटनांना राज्य शासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना कोविड मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारतांना त्यांनी त्याचे श्रेय आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. आता त्यांनी त्याच आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची व न्यायाची कालबद्ध पदोन्नती व नियमित पदोन्नती आणि इतर मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करून पुण्यकर्म करावे असे आवाहन आदिवासी सेवक तथा महासंघाचे नेते डॉ. कांतिलाल टाटिया यांनी केले.
आजपासून होणाऱ्या जि.प. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे व त्यांची टीम स्वतः उपोषणाला बसणार आहे तसेच जि.प.आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व हिवताप कर्मचारी खांद्याला खांदा लावून आंदोलन सहभागी होणार असल्याचे चिटणीस सतीश जाधव यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुरेश वसावे, राजूभाई, वाय.पी.गिरी, रामदास सोनार, विनोद राणे, दिलवरसिंग पावरा, के.के.पावरा, विशाल मोघे, राजू परदेशी, सुरेखा वळवी, रेखा बाविस्कर, सरला तिरमले, ज्योती संदानशिव, भावना वळवी सिस्टर यांनी केले.








