नवापूर l प्रतिनिधी-
चरणमाळ घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी झाला होता. या अपघातात ट्रक चालक अडकला हे पाहताच नवापूर पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल आठ तासानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर तालुक्यात नाशिकहुन पंजाबकडे कांदा घेऊन जाणार्या ट्रकचा चरणमाळ घाटात ब्रेक निकामी झाल्याने रात्री १ वाजता अतितीव्र वळणावर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक अडकला होता. नवापूर पोलिसांनी तसेच घटनास्थळी आलेल्या कारागिरांनी धाव घेतली. नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ व पोहेकॉ विकास पाटील सह सोबत असलेले पोलीस कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करीत गॅस कटरच्या सहाय्याने ट्रकचा पत्रा कापून तब्बल आठ तासानंतर वाहन चालकास सुखरूप बाहेर काढले. नवापूर पोलिसांचं पथक आणि उपस्थित कारागिरांनी रात्री दोन वाजे पासुन या अडकलेल्या ट्रक चालकास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना सकाळी यश आले. अडकलेले ट्रक चालकास जिवंत सुखरूप बाहेर काढून पुढील उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला आहे.








