नवापूर ! प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत असलेल्या नवापूर- साक्री रस्त्यावरील काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असून, कामाची चौकशी व्हावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय ट्रायबल पार्टीने दिला आहे.
भारतीय ट्रायबल पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष के.टी गावित यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, नवापुर यांचे अंतर्गत नवापुर-साक्री रस्ता राज्यमार्ग क्र.१४ वर १६ किलोमीटर पर्यंतचे काम नवापुर येथील ठेकेदाराला २ कोटी ८८ लाखाचा ठेका देण्यात आला आहे. या रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची रेलचेल असते. रस्त्यावरील बोरझर घाटात रस्त्याचे काम न झाल्यामुळे नेहमी अपघात होत असतात. तांत्रीकदृष्ट्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. रस्त्याचे काम तत्काळ थांबवून क्वॉलीटी कंन्ट्रोलमार्फत चौकशी करून ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे व इतर ठेकेदाराला ठेका देण्यात यावा.
रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या साईटपट्टयाचे काम करतांना हॉर्ड मुरूमचा वापर करणे गरजेचे असतांना आयसीबीने बाजुच्या शेतातील काळी माती टाकून साईटपट्टया भरण्याचे काम सुरू आहे.बोरझर घाटातील वेगवेगळ्या वळण रस्त्यावरील वळणांवर तांत्रीकदृष्ट्या रस्त्याला स्लॅपच दिलेला नाही. कारपेट टाकण्याच्या अगोदर ७५ मीलीचे खडे भरतांना खडीकरण करून त्यावर रोलर फिरविणे गरजेचे असते व नंतर रस्त्यावर कारपेट टाकून रोलर फिरवण्याची आवश्यकता असताना गावठी पध्दतीने काम केलेले आहे.काम करतांना एकाही ठिकाणी तांत्रीक दृष्टीने काम केलेले नाही. रस्त्यावरील असलेला पुल व फरशीवर रंगरंगोटी करण्यात आलेले नाही. रस्त्यांच्या दोन्ही बाजुच्या झाडांच्या खोडांना रंगरंगोटी केलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.