नंदुरबार l प्रतिनिधी-
तालुक्यातील भालेर येथील का. वि. प्र संस्था, संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा पालकांसमवेत गुणगौरव व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करणे आणि भविष्यातील यशासाठी त्यांना प्रेरणा देणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील, कार्याध्यक्ष विजय बोरसे, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंभेलचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून काकरदेचे माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी ,प्राचार्य एस. जी. सैंदाणे, पर्यवेक्षक पी. डी. पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचे, जिद्दीचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या प्रोत्साहनाचे फलित असल्याचे सांगितले. “यश ही अंतिम मंजिल नसून, पुढील मोठ्या यशाची नांदी आहे.
या सत्कार समारंभास भालेर सह नगााव, तिशी, वळवद, काकर्डे, होळ, निंभेल, कोपर्ली, अमळथा, जुने मोहिदा व ओसरर्ली आदी गावांतील विद्यार्थी -विद्यार्थिनींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयातील शिक्षकवृंदाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांना या यशाची शिदोरी मिळाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ कौतुकाचा क्षण नसून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्था, विद्यालयाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि. व्हि. ईशी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले







