नंदुरबार l प्रतिनिधी-
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर कुठेही पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून काटेकोर पद्धतीने आराखडा तयार करावा तसेच महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या दुष्काळी सवलतींचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल असे नियोजन करावे; अशा सूचना आज दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज निवासस्थानी दुष्काळग्रस्त उपस्थिती संदर्भात अधिकाऱ्यांच्या सोबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला प्रांत अधिकारी बी. ए.कापसे नंदुरबार तहसीलदार संतोष डेरे, तालुका कृषी अधिकारी के.ए.ठाकूर उपस्थित होते. या आढावा बैठकीत आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीवर कुठल्या उपाययोजना राबविल्या पाहिजे या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
तसेच दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना नागरिकांना आणि जनावरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आतापासूनच आराखडा तयार करण्यात यावा असेही सांगितले. याच प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे. महाराष्ट्रात पावसा अभावी दुष्काळ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.








