नंदुरबार l प्रतिनिधी
नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करताना, नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना राज्य सेवा हक्क दिनानिमित्त विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नागरिकांना सुलभ, जलद व पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज अधोरेखित केली. या वेळी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रधान सचिव अतुल पाटणे, विभागीय आयुक्त बलदेव सिंह, सुधाकर तेलंग, किरण जाधव व चित्रा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होते.
नंदुरबारचा ठसा राज्य पातळीवर
नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे सेवा वितरण अधिक प्रभावी व नागरिकाभिमुख झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सेवा प्रक्रियेत गती, पारदर्शकता आणि सुलभता आणली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरावर त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
एआय व डिजिटल प्रणालीकडे वाटचाल
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी सांगितले की, पासपोर्ट सेवेसारख्या कार्यक्षम प्रणालींचा आदर्श घेत शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटल समन्वय वाढविण्याचे काम सुरू आहे. भविष्यात एआय आधारित यंत्रणेद्वारे नागरिकांच्या गरजा ओळखून सेवा देण्याची प्रणाली विकसित होत असून, डिजी लॉकर व “गोल्डन डाटा”च्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सेवा आपोआप उपलब्ध करून देण्याची संकल्पना पुढे येत आहे.
उपक्रमांचे संस्थात्मक रूपांतर आवश्यक
मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, एका जिल्ह्यात यशस्वी ठरलेले उपक्रम संपूर्ण राज्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी अशा उपक्रमांचे दस्तऐवजीकरण करून त्यांची राज्यभर पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गुणवत्तेनुसार जिल्ह्यांचा गौरव
या कार्यक्रमात सेवा वितरणाच्या गुणवत्तेनुसार छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व विशेष स्थान मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. या जिल्ह्यांनी निर्धारित कालावधीत सेवा देण्यात 90 टक्क्यांहून अधिक यश मिळवले.
नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान
राज्यभरातील विविध विभागांमध्ये डिजिटल व तांत्रिक सुधारणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील गौरव करण्यात आला. यात नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी केले, तर आभार विभागीय आयुक्त किरण जाधव यांनी मानले.








