नंदुरबार | प्रतिनिधी –
नंदुरबार शहरात दहशत माजविणार्या गावगुंडांचा बंदोबस्त करण्यात येवून त्यांना खतपाणी घालणार्या त्यांच्या मुख्य सुत्रधारालाही अटक करण्यात यावी, अशी मागणी माजी आ.शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली.
श्री.चौधरी म्हणाले, दि.१० जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत माझा मुलगा प्रथमेश चौधरी याला उपनगराध्यक्ष पद मिळाले. त्यामुळे विजयी मिरवणूक काढण्यात आली. परंतू शहरातील जळका बाजार परिसरात काही गावगुंड तथा समाजकंटकांनी मिरवणुकीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर मर्डरच्या केसेस आहेत, अवैध धंदे चालवणारे लोक आहेत, काहींवर नागरिकांच्या जागा हडप करण्याच्या केसेस आहेत. काहींनी दुकानांवर कब्जा केला आहे. त्या परिसरात हे लोक नेहमी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे २०-२५ गुंड आहेत. ते कुठल्याही पक्षाचे नाहीत, ते फक्त त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी अशी कामे करतात. मात्र, माझा मुलगा पंचवीस वर्षाचा असताना उपनगराध्यक्ष झाला हे त्यांना सहन झालेले नाही. अशा गावगुंडांनी परवा रात्री आम्ही झोपलेले असतांना आमच्या घरावर हल्ला करुन घर जाळण्यासह आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
गाड्यांना पेट्रोल बॉम्बने जाळण्याचा प्रयत्न केला. एका आमदाराच्या घरावर अशाप्रकारे गावगुंडांकडून हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत अशा गावगुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा व त्यांना खतपाणी घालणार्या मुख्य सुत्रधारालाही अटक करण्यात यावी. या गावगुंडांच्या मोबाईलचे तसेच अधिकार्यांना कोणी कोणी फोन केले त्याचा संपुर्ण रेकॉर्ड पोलीसांनी तपासावा, तसे केल्यास या गावगुंडांचा सुत्रधार कोण आहे, हे निदर्शनास येईल, असेही श्री.चौधरी यांनी सांगितले.
आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारण ऍस्ट्रासिटी दाखल करणे आता नवीन राहिलेले नाही. ती महिला कोकणी हिलला राहते, तीच्या आमचा काय संबंध? आम्ही गुन्हेगार असलो तर चौकशी करा. मात्र, जे गावगुंंड विविध गुन्हयांमध्ये जेलमध्ये राहून आले आहेत, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही श्री.चौधरी यांनी केली. यावेळी श्री.चौधरी यांनी प्रोजेक्टरवर त्यांच्या घरावर कशाप्रकारे हल्ला करण्यात आला त्याचे सीसीटीव्ही फुटेजही दाखविले. यावेळी उद्योगपती डॉ.रविंद्र चौधरी, नगरसेवक किरण रघुवंशी, प्रेम सोनार, भरत चौधरी उपस्थित होते.








