नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील रस्त्यांनी गाठलेली तळमळीची पातळी आणि प्रशासनाच्या थंड प्रतिसादाने संतप्त झालेल्या नवापूरकरांनी आज चक्क ‘बेशरम’ आंदोलन करत नगरपालिकेला आरसा दाखवला. हे केवळ आंदोलन नव्हते, तर प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा नवापूरकरांचा एल्गार होता अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेले रस्ते, जीवघेणे खड्डे आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसून ‘बेशरम’ची झाडे लावली. “नवापूर नगरपालिका हाय हाय”, “रस्त्यांची कामे झालीच पाहिजेत” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नागरिकांचा हा संताप इतका तीव्र होता. कॉलेजपासून सुरू झालेल्या या अभूतपूर्व आंदोलनात शहरातील शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे सामील झाले. प्रत्येक प्रमुख चौकात, जिथे-जिथे खड्डे होते, तिथे आंदोलकांनी ‘बेशरम’ची रोपे लावत, खड्ड्यांचे भयाण वास्तव प्रशासनाच्या डोळ्यासमोर उभे केले. श्री गणपती मंदिरासमोरील एका महाकाय खड्ड्याजवळ आंदोलकांनी बांधकाम विभागाचे अधिकारी भामरे यांना बोलावून त्यांना ही झाडं सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत ही प्रतीकात्मक ‘बेशरम’ वृक्षे ताब्यात घेतली, पण नागरिकांचा संदेश स्पष्ट होता: प्रशासनाचा ‘बेशरम’पणा आता सहन होणार नाही.
यानंतर आंदोलक थेट नवापूर नगरपालिका कार्यालयात धडकले. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घुसून त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेबाबत तातडीने उत्तर मागितले. नागरिकांच्या या एल्गारामुळे नवापूर नगरपालिकेवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.