नंदुरबार l प्रतिनिधी
वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ,आराध्य दैवत विठ्ठल माऊलीचा १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर शहरातील अंधारे चौकात लोकार्पण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आदल्या दिवशी शनिवार दि.5 जुलै रोजी मूर्तीची मिरवणूक काढण्यातील येईल. मूर्ती विराजमान होत असलेल्या ठिकाणची शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी काल रविवारी पाहणी केली.
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय असून, वारकरी संप्रदायासह सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीचे खुले दर्शन व्हावे यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील अंधारे चौकात पालिकेच्या वतीने पांडुरंगाची विटेवरी कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या १२ फुटांचा भव्य मूर्तीचे रविवार दि. 6 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात येणार आहे.
नाशिक येथून मूर्ती बनवण्यात आलेली आहे. मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, शनिवार 5 जुलै रोजी मूर्ती नंदुरबारात दाखल होईल. त्यादिवशी दुपारी 2 वाजता धुळे चौफुली पासून टाळ मृदुंगाच्या गजर, पारंपारिक वाद्य व विठू माऊलीच्या जयघोषात अंधारे चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे.
अंधारे चौकात विद्युत रोषणाई
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मूर्तीचे लोकार्पण होणार असल्याने अंधारे चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. २ दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
मूर्ती सामाजिक एकतेचे प्रतिक
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय असून, विठ्ठलाचे स्थान धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवधाम उद्यानानंतर आता विठू माऊलीची भव्य मूर्ती साकारण्यात येत असल्यामुळे नंदनगरीच्या वैभवात भर पडणार आहे. विठ्ठलाच्या प्रेमात न्हालेल्या भक्तांच्या श्रद्धेची ही भव्य मूर्ती सामाजिक एकतेचे प्रतिक ठरले.
—-आ.चंद्रकांत रघुवंशी