नंदुरबार l प्रतिनिधी
अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार शहर पोलिसांनी कारवाई करीत एकुण 05 लाख 39 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील कंजरवाडा कडे जाणाऱ्या रोडाकडुन एक इसम विदेशी दारुचा माल लाल रंगाच्या चारचाकी वाहनातुन घेऊन जात आहे, अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी शहर पोलीसांचे पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.
मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने शहर पोलीसांचे पथक हे कंजरवाडा परिसरातील गौतम नगर परिसरात थोड्या अंतरावर येऊन थांबले असता तेथे काही वेळाने एक लाल रंगाची चारचाकी वाहन कंजरवाड्याकडुन येतांना दिसले, सदर गाडीचा पोलीस पथकाने पाठलाग करुन गाडी यशवंत विदयालय परिसरात अडविली असता सदर लाल रंगाचे टाटा कंपनीचे वाहन ( क्र.एम.एच.41, व्ही.0742 ) हिचेवरील चालक विजयसिंग रामसिंग नाईक रा. केरवा, खांडबारा, ता. नवापुर जि. नंदुरबार तसेच त्याचे सोबत पंकज प्रकाश चौधरी संताजी चौक, खांडबारा, ता. नवापुर जि. नंदुरबार अशांना गाडीमध्ये काय आहे. बाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.
सदर गाडीची तपासणी करता त्यामध्ये विदेशी दारुचे बॉक्स मिळुन आले. त्याबाबत नमुद इसमांना मालाची परवानगी आहे काय बाबत विचारणा करता त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी नसलेबाबत कळविले. सदर कारवाईत एकुण 5 लाख 39 हजार 200 रुपये किमतीचा विदेशी दारु तसेच वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर पोलीसांना यश मिळाले असून आरोपींविरुध्द शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.284/2025 महा. दारुबंदी कायदा कलम 65 (अ) (ई), 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, सपोनि रविंद्र बागुल, पोउपनि स्वप्नील पाटील, पोहेकों भटु धनगर, सुनिल वाकडे, पोकों राहुल पांढारकर, भगवान मुंडे, हरेश कोळी, किरण मोरे, मपोकों निंबाबाई वाघमोडे अशांनी केली आहे.