नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा, (नंदुरबार) कृष्णकांत कनवारिया (शहादा), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नाशिकचे कार्यकारी अभियंता श्रीमती रंजना दळवी, धुळे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प प्राधिकारी अजय यादव, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता संजीव पवार, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल वाघ, आदि यावेळी उपस्थित होते.
बैठकीत प्रकाशा येथील गोमाई नदीवरील पुलाच्या कामाच्या संथगतीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि संबंधित विभागाला तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. शहरात वाहतूक सिग्नल आणि रस्त्यांची योग्य चिन्हे लावण्याचे निर्देश नगरपरिषदेला देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी बोलतांना म्हणाल्या, जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) पाहणी आणि निश्चिती करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने तीन महिन्यांत अहवाल सादर करावा तसेच रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी राखीव ठेवण्यात आला असून, काही कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. या निधीचा वापर रस्त्यांची सुधारणा आणि अपघात कमी करण्यासाठी केला जाणार आहे.
या बैठकीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद, शिक्षण विभाग आणि पोलीस यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन आणि स्वयंशिस्त याबद्दल जनजागृती मोहीम राबवण्याचे ठरवले.
*ठळक मुद्दे:*
• गोमाई नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.
• शहरात वाहतूक सिग्नल आणि रस्त्यांची चिन्हे लावण्याचे निर्देश.
• धोकादायक ठिकाणांसाठी (ब्लॅक स्पॉट) समिती स्थापन.
• रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी निधी राखीव.
• वाहतूक नियमांचे पालन आणि स्वयंशिस्त याबद्दल जनजागृती मोहीम.