नंदुरबार l प्रतिनिधी
अग्निशमन सेवेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने नंदुरबार आणि शहादा नगरपालिकांना राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी एक मिनी रेस्क्यू टेंडर अग्निशमन वाहन प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते या वाहनांचा अधिकृत ताबा नगरपालिकांना देण्यात आला.
यावेळी सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) नितीन कापडणीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही. व्ही. बोरसे, नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी या नवीन वाहनांची वैशिष्ट्ये सांगितली. त्यांनी स्पष्ट केले की, या वाहनांमध्ये आग विझवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच 30 हून अधिक प्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी लागणाऱ्या उपकरणांचा समावेश आहे. विशेषतः, इमारतींमध्ये अडकलेले नागरिक किंवा अपघातग्रस्त व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी कटर, रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी साधने आणि झाडे तोडण्यासाठी आवश्यक उपकरणे यांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी यावेळी सांगितले की, या वाहनांचा वापर शहरांमध्ये होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये मोठ्या प्रमाणात मदतकारक ठरेल, असे सांगितले. मोठी अग्निशमन वाहने जिथे पोहोचू शकत नाहीत, तिथेही ही मिनी रेस्क्यू टेंडर वाहने प्रभावी ठरतील. त्यामुळे नागरिकांना तात्काळ मदत मिळेल आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम होईल.
या नवीन सुविधेमुळे नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार आहे, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.