नंदुरबार l प्रतिनिधी
चिमण्यांचे पर्यावरणीय संतुलनात महत्त्व लक्षात घेता, दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. या विशेष दिनाच्या निमित्ताने, नंदुरबार जिल्हा प्रशासन व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने ऑनलाईन चिमणी गणना 2025 अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील चिमण्यांची संख्या नोंदवून चिमणी संवर्धन मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. यासाठी https://forms.gle/JN4g615cYApyMkj89 या लिंकवर जाऊन चिमण्यांची माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वाढते शहरीकरण, रासायनिक कीटकनाशकांचा वापर, मोबाईल टॉवर्समधून निघणारे किरणोत्सर्ग यामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. या पार्श्वभूमीवर, चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय हे प्रत्येक नागरिकांनी अवलंबले पाहिजेत
• घराच्या अंगणात किंवा गच्चीवर चिमण्यांसाठी धान्य व स्वच्छ पाणी ठेवणे.
• झाडांची लागवड करून चिमण्यांना सुरक्षित घरटी उपलब्ध करून देणे.
• चिमण्यांच्या संवर्धनासाठी समाजात जागृती निर्माण करणे.
*चिमणी गणनेत सहभागी व्हा आणि निसर्ग संरक्षणात योगदान द्या*
नंदुरबार जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी, वन्यजीव संस्था, शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय संस्थांचे कर्मचारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी व सर्व नागरिक यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी चिमणीसोबत सेल्फी काढून तो 8806314844 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा, असेही सांगण्यात आले आहे.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी डॉ. मकरंद गुजर यांनीही निसर्ग संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.