म्हसावद l प्रतिनिधी-
शहादा येथील मोहिदा तश शिवारात आयोजित श्री शिव महापुराण महाकथा आयोजना संबंधी विचार विनिमय करण्यासाठी शहरातील विविध पक्ष,संघटना, गणेश मंडळ, संस्था पदाधिकाऱ्यांचा बैठकीत उपस्थित भाविकांनी विविध सेवा देण्यासाठी आपण तत्पर असल्याचे घोषित केले.
श्री शिवमहापुराण महाकथा सिहोर (मध्य प्रदेश) येथील सुप्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून दिनांक 1 ते 5 एप्रिल दरम्यान भाविकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.श्री शिवमहापुराण महाकथा नियोजन समितीच्या वतीने विविध समित्यांमार्फत शिवकथा संपन्न केली जाणार आहे. याच्या नियोजनासाठी येथील मीरा प्रताप लॉन्स येथे शनिवारी दुपारी नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश पाडवी,शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा . मकरंद पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मणराव कदम, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अभिजीत पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, आयोजन समितीचे श्यामभाऊ जाधव, अजय गोयल, श्याम राजपूत, मोतीलाल जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार राजेश पाडवी यांनी महाकथा नियोजन व आयोजनासंबंधी विस्ताराने माहिती दिली.यावेळी उपस्थित भाविकांपैकी मोड ग्रामस्थ तसेच मुनेश अग्रवाल परिवाराच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची घोषणा केली तर मीरा प्रताप लॉन्स व सौभाग्य मंगल कार्यालय यांनी पाचही दिवस मुक्कामाची व्यवस्था करण्याचे घोषित केले. प्रा.मकरंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.डाॅ.अनिल सोलंकी यांनी केले. आभार रुपेश जाधव यांनी मानले. यावेळी शहर व परिसरातील विविध सहकारी व समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह गणेश मंडळ, बजरंग दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.