नंदुरबार l प्रतिनिधी
देशभरात वाढत असलेल्या रक्तक्षय (ऍनिमिया) आणि कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने गुणसंवर्धित तांदूळ (Fortified Rice) वितरणाचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात तालुका स्तरावर प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रेशन दुकान परवानाधारक, महिला बचत गट, अंगणवाडी कर्मचारी आणि लाभार्थी यांना 31 मार्च 2025 पर्यंत प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, मास्टर्स ट्रेनर्स म्हणून विठ्ठल काकडे, सचिन शिंदे आणि हितेश ढाले हे प्रशिक्षण देत आहेत.
*प्रशिक्षणाची सुरुवात*
18 मार्च 2025 रोजी नंदुरबार तहसील कार्यालयात पहिल्या प्रशिक्षण सत्राचे आयोजनाने करण्यात आले. या सत्रात गुणसंवर्धित तांदळात लोह, फोलिक आम्ल आणि व्हिटॅमिन बी-12 असते, ज्यामुळे रक्तक्षयासह कुपोषण दूर होऊन नागरिकांचे आरोग्य सुधारते, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी पॉवर पॉईंट सादरीकरण आणि माहितीपट (व्हिडीओ) च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले गेले. तसेच सर्व उपस्थितांना व्हाट्स ॲप द्वारे प्रशिक्षण साहित्य पुरविण्यात आले, तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या फेसबुक पेजवरही हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
*प्रशिक्षणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद*
या उपक्रमाला रेशन दुकानदार, अंगणवाडी कर्मचारी आणि आश्रमशाळांचे प्रतिनिधी यांनी मोठा प्रतिसाद दिला. गुणसंवर्धित तांदूळ आरोग्यासाठी लाभदायक असून, याबाबत अधिकाधिक जनजागृती करू, असे उपस्थित प्रशिक्षणार्थींनी आश्वासन दिले.
*तालुका स्तरावर प्रशिक्षणाचे वेळापत्रक*
जिल्ह्यात नवापूर तालुक्यात 19 मार्च रोजी, शहादा तालुक्यात 21 मार्च रोजी, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यांत 27 मार्च रोजी, तर अक्राणी तालुक्यात 28 मार्च रोजी दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये गणेश मिसाळ यांनी कळविले आहे.