नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहराच्या विविध भागात भेट दिल्यानंतर माहीत झालेल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम हाती घेऊ. रस्ते पाणी वीज आणि गटारी समस्या सोडवण्याबरोबरच शहरातील नागरिकांसाठी अत्यंत सुसज्ज आकर्षक असे भव्य उद्यान प्रकाशा येथे तापी काठावर आणि नंदुरबार शहरात झराळी परिसरात उभारण्याचा प्रयत्न आहे. कारण सोयी सुविधांच्या विकासाबरोबरच नागरिकांना मनोविकास घडवणारी साधने दिली पाहिजे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते; असे सांगतानाच शहरातील सर्व उद्यानांचा योग्य तो सर्वतोपरी विकास नव्याने घडवू तसेच त्या ठिकाणी नागरिकांना लागू केलेले शुल्क रद्द करून अधिक सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी साक्री नाका परिसरातील जनसंवाद उपक्रम अंतर्गत पार पडलेल्या बैठकीत दिले.
माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी सुरू केलेल्या शहराच्या प्रत्येक भागात भेट देण्याच्या व जनसंवाद करण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून विजेचा अभाव, पथदिव्यांचा अभाव, रस्त्यांची निकृष्टता, भुयारी गटारीच्या समस्या, दुर्लक्षित राहिलेला ओपन स्पेस विकास याविषयीचे म्हणणे नागरिक मांडू लागले आहेत.
नंदुरबार शहराच्या सर्व भागात भेटी देऊन नागरी समस्या माहीत करून घेत आहेत. त्या अंतर्गतच साक्री नाका परिसरातील नागरिकांशी डॉ विजयकुमार गावित यांनी संवाद साधला.
अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगताना साक्री नाका भागातील उपस्थित नागरिकांनी रस्ते गटारी स्वच्छता आणि आरोग्य याचा अभाव असल्याची माहिती दिली. जी काही कामे झाली ती रस्त्यांची कामे निकृष्ट झाली असून त्रासदायक बनलेले भुयारी गटारीचे निकृष्ट काम, ओपन स्पेस आणि उद्यानाचा अपूर्ण विकास, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुविधांचा अभाव या संदर्भाने तक्रारी मांडल्या. आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी नागरिकांना त्यांच्या या सर्व अडीअडचणी समस्या जाणून घेत त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले. ते सोडविण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम व आराखडा हाती घेणार असल्याची माहिती देखील विजयकुमार गावित यांनी दिली.
या प्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत चौधरी, माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, माजी नगरसेवक आनंदा माळी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.