नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यासाठी घरकुलांचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येकाला आपल्या हक्काचे घरकुल मिळेल. कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन आज खासदार ॲड. गोवाल पाडवी यांनी केले.
ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आयोजित ग्रामीण क्षेत्रासाठी प्रधानमंत्रीआवास योजना टप्पा २ अंतर्गत ६८ हजार ६४५ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरणासाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सावन कुमार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहूल गावडे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार तसेच नंदुरबार पंचायत समिती क्षेत्रातील घरकुलाचे पात्र लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार ॲड. पाडवी म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा २
अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ३१ हाजर ८८६ घरांचे उदिष्ट आहे. त्यातील १ लाख २२ हजार ८६४ लाभार्थ्यांच्या घरकुलांमुळे मंजुरी मिळाली आहे. यातील ६८ हजार ६४५ लाभार्थ्यांना आज पंधरा हजारांचा पहिला हप्ता वितरीत केला गेला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साली नंदुरबार हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक घरकुल मंजूर होणारा जिल्हा असून
मंजूर झालेली घरकुलांची उद्दिष्टे पूर्ण करण्यात राज्यात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा असल्याचेही यावेळी खासदार डॉ. पाडवी यांनी सांगितले.
घरकुल योजनेंतर्गत पहिला हप्ता ₹१५ हजार मिळणार असून, पाया खोदल्यानंतर दुसरा हप्ता ₹७० हजार कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय मिळेल. तिसरा हप्ता ₹३० हजार हा लिंटल लेव्हलपर्यंतच्या कामानंतर मिळणार असून, घर पूर्ण झाल्यावर अंतिम हप्ता ₹५ हजार वितरित केला जाईल. याशिवाय, ₹२६ हजार,७३० रोजगार हमी योजनेतून मिळणार असून, यासाठी तात्काळ ९० दिवसांची मस्टर मागणी करणे आवश्यक आहे. तसेच, जर लाभार्थ्याने यापूर्वी शौचालय अनुदान घेतले नसल्यास, ₹१२ हजारांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
घरकुलाच्या बांधकामासाठी २६९ चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरकुलाची माफक अपेक्षा ठेवण्यात आली आहे. घरकुल अनुदानासाठी कोणतीही अडचण येत असेल किंवा अडवणूक केली जात असेल, तर तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे आणि यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल गावडे यांनी सांगितले.
राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ‘ग्रामीण’ (टप्पा – २) च्या अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना स्वीकृती पत्राचे वितरण तसेच १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण पुण्यातील बालेवाडी येथून करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील, पंचायत समित्या व सर्व ग्रामपंचायतींमध्ये या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.
जिल्ह्यामध्ये २०२४-२५ मध्ये एकुण १ लाख २२ हजार ७३७ एवढ्या लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली असुन आज कार्यक्रमात मंजुर लाभार्थ्यांपैकी १ लाख ३ हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरीत करण्यात आला. उर्वरित घरकुले ८ दिवसात मंजुर करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले. घरकुल बांधकामाबाबत व मनरेगा अंतर्गत मिळणाऱ्या लाभाबाबत व शौचालयाबाबत कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात नंदुरबार तालुक्यातील १० लाभार्थ्यांना घरकुलाच्या हप्त्याचे व निवडपत्रांचे वितरण करण्यात आले.