नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरात गांजा बाळगण्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली असून या तीन लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नंदुरबार शहरातील कोम्बींग ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, कंजरवाडा परिसरात सुदाम तिळंगे हा घरात बेकायदेशीररित्या गांजा कब्जात बाळगुन आहे, अशी माहिती मिळाली. त्याअन्वये नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, व पथक तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार मनेळ व पो. ठाणे पथक यांच्या मदतीने कारवाई करण्यासाठी रवाना झाले.
स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांचे पथक मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे शहरातील कंजरवाडा परिसरातील इसम सुदाम तिलंगे याचे घराजवळ जाऊन सदर इसमास आवाज देऊन बाहेर बोलाविले असता तो बाहेर आला त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुदाम रमेश तिलंगे रा. कंजरवाडा, नंदुरबार असे सांगितले. सदर वेळी त्याचे घराची झडती घेतली असता घरात एका कोप-यातील गोणीत उग्रवासाचा सुका गांजा प्रकारातील अंमली पदार्थ मिळून आला. सदर इसमाचे कब्जातुन एकुण 16 किलो 900 ग्रॅम वजनाचा 3 लाख 38 रुपये किमतीचा सुका गांजा मिळून आला असून सदरचा मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेण्यात आला आहे. सदर इसम नामे सुदाम रमेश तिलंगे याचे विरुध्द शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 74/2025 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 चे कलम 8(क), 20, 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहेत.
सदरची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार उपविभाग संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.