नंदुरबार l प्रतिनिधी-
प्रजासत्ताक दिन साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्ह्यातील जातीय संवेदनशीलतेच्या स्थितीचा विचार करता, नंदुरबार जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 अंतर्गत कलम 37 (1)(3) लागू करत कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 12.01 वाजेपासून 5 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
धार्मिक तणाव आणि आंदोलनांचा धोका
नंदुरबार जिल्हा धार्मिकदृषट्या अतिसंवेदनशील आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काही संघटनांकडून आंदोलन, उपोषण, धरणे, तसेच आत्मदहनासारख्या घटनांचा धोका वर्तवण्यात आला आहे. मागील घटनांच्या अनुभवांवरून जातीय दंगलींचा संभाव्य धोका असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नवापूर, शहादा, अक्कलकुवा, तळोदा यांसारखे भाग संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
यावर असेल मनाई
या आदेशानुसार खालील कृत्यांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे:
तलवार, बंदूक, सुरा, लाठ्या किंवा इजा पोहोचवणारी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
ज्वलनशील पदार्थ, स्फोटके किंवा शारीरिक दुखापती घडवणारे कोणतेही साहित्य जवळ बाळगणे.
दगडफेक किंवा अस्त्र-शस्त्र बरोबर नेणे, तयार करणे किंवा साठवणे.
सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी, गाणी किंवा शांतता भंग करणारे भाषण करणे. प्रतिमा जाळणे किंवा प्रदर्शन करणे, ज्यामुळे धार्मिक किंवा जातीय भावना भडकू शकतात.
पोलीस परवानगीशिवाय पाच किंवा अधिक व्यक्तींनी जमाव तयार करणे, सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे.
यासाठी असेल विशेष सूट
वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
शासकीय कामासाठी शस्त्र धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही परवानगी आहे.
लग्न मिरवणुका, प्रेतयात्रा, आठवडे बाजार तसेच सरकारी कामांसाठी एकत्र होणाऱ्या जमावांवर हा आदेश लागू होणार नाही.
प्रजासत्ताक दिनी विशेष सुरक्षा
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांदरम्यान संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेषतः संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा आदेश 5 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या आदेशात नमूद केले आहे.