नंदुरबार l प्रतिनिधी-
दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा “राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात येत असतो या दिनानिमित्त नुकतेच जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस झटणारे जिल्ह्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
15 जानेवारी हा दिवस ऑलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन “ राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली असून दिवंगत खाशाबा जाधव, यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, हेलसिंकी 1952 मध्ये पहिले वैयक्तिक क्रीडा प्रकारातील कुस्ती क्रीडा प्रकारात पहिले पदक (कांस्य) पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याचा बहुमान व नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा “राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात येत असून या दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्धाटन अप्पर जिल्हाधिकारी (ससप्र) प्रकाश आहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण (प्राथ.), जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते बळवंत निकुंभ, प्राचार्य पंकज पाठक, वरिष्ठ क्रीडा शिक्षक राजेंद्र साळुंखे, सुनिल सुर्यंवंशी, मिनल वळवी आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश आहिरराव यांनी सर्व क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मयुर ठाकरे यांनी केले तर आभार सुनिल सुर्यवंशी यांनी मानले. राज्य क्रीडा दिन यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे, क्रीडा अधिकारी ओमकार जाधव, संजय बेलोरकर, कर्मचारी मुकेश बारी, कल्पेश चौधरी, दिगंबर चौधरी यांनी परिश्रम घेतले.