नंदुरबार l प्रतिनिधी
जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातून चोरी केलेल्या 14 मोटरसायकली स्थानिक गुन्हे शाखेकडुन हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी ती तिघांना अटक करण्यात आली आहे.
शहर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी किरण ऊर्फ कुणाल लक्ष्मण माळी यांची होंडा कंपनीची मोटर सायकल ही नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप पुतळयाजवळील एका दुकानासमोरुन चोरी झालेबाबतची फिर्यादवरुन शहर पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरुध्द भा.द.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की, प्रकाशा ते तळोदा रस्त्या दरम्यान शहादा येथे दोन ते तीन इसम विना क्रमांकाचे दुचाकी मोटारसायकली विक्री करण्याचे उददेशाने फिरत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीनुसार प्रकाशा ते तळोदा रस्त्यादरम्यान संशयित इसमांचा शोध घेतला असता ते तळोदा रस्त्यादरम्यान असलेल्या एका हॉटेलसमोर दिसुन आले. सदर इसमांजवळ पोलीस पथक जात असतांना त्यातील एकास संशय आल्याने त्याने तेथुन पळ काढला, बाकी तीन इसमांना दुचाकीसह ताब्यात घेण्यात पोलीस पथकास यश मिळाले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी अनुक्रमे विपूल नगराज पाटील रा. वर्षी, ता.शिंदखेडा, जि.धुळे भाग्यशाल ऊर्फ लखन संतोष सावळे रा. समशेरपुर, ता.जि. नंदुरबार योगेश्वर ऊर्फ मुन्ना आधार कोळी रा.समशेरपूर, ता.जि. नंदुरबार, असे सांगितले. तसेच सदर ठिकाणाहून पळ काढलेल्या इसमाबाबत विचारता त्यांनी त्याचे नाव तुषार शालिग्राम कोळी, रा. म्हळसर, ता.शिंदखेडा, जि.धुळे असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मोटार सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.
त्यांना पुन्हा विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस केली असता त्यांनी दोन्ही मोटारसायकल अमळनेर येथुन चोरी केले असल्याचे सांगितले. त्याबाबत पोलीस पथकाने संबंधित पोलीस ठाण्याकडुन माहिती घेऊन सदर वाहने चोरीचे असल्याबाबत खात्री केली. तसेच सदर इसमांकडे अजुन काही चोरीच्या मोटारसाकलींबाबत विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी मागील काही
दिवसात नंदुरबार, धुळे व जळगाव येथुन काही मोटारसायकली चोरी केले असल्याची माहिती दिली. सदर इसमांनी चोरी केलेल्या एकुण 4 लाख 5 हजार रु. किमतीच्या 14 मोटारसायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ राकेश मोरे, विशाल नागरे, पोना/मोहन ढमढेरे, पोकों/विजय ढीवरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांनी केली आहे.