नंदुरबार l प्रतिनिधी-
सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने आर्थिक गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस दलाकडून तपासणी करण्यात येत आहे. नंदुरबार शहरातील अंधारे चौकाजवळ तीन लाखांची तर शहादा लगतच्या एस.कुमार लॉन्स परिसरात एक लाख ४८ हजारांची अशा दोन कारवायांमध्ये ४ लाख ४८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
नंदुरबार शहरात (दि.१३) दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास अंधारे चौकाकडून खोडाईमाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पटेल सर्जिकल हॉस्पिटलसमोर एक दुचाकी (क्र.एमएच ३९ एएफ ५८९९) संशयास्पदरित्या जात असल्याचे आढळून आले. सदरची दुचाकीची तपासणी केली असता त्यात तीन लाख रूपंयाची रक्कम आढळून आली. सदर रक्कमेबाबत मनिषकुमार पांडे यांच्याकडून समर्पक उत्तर व विवरण न मिळाल्याने सदरची रक्कम संशयास्पद असल्याच्या शक्यतेने व सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने जप्त करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी ट्रेझरीत जमा करण्यासाठी ताब्यात घेण्यात आली आहे.
तसेच शहादा येथे काल दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास एस.कुमार लॉन्स परिसरातून संशयास्पद जाणारे एका चारचाकी वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात एक लाख ४८ हजारांची रोकड आढळून आली.
वाहनधारकांना समर्पक उत्तर न देता आल्याने सदरची रक्कमदेखील संशयास्पद असल्याने जप्त करण्यात आली आहे. काल दिवसभरात पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली असून यात संशयास्पद आढळलेली ४ लाख ४८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून वॉच ठेवण्यात येत असून ठिकठिकाणी तपासणी नाकेदेखील कार्यान्वित करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.