नंदुरबार l प्रतिनिधी-
तुम्ही निवडून दिलेले आमदार कधीच इथे थांबले नाही निवडून आले की मुंबईला निघून जातात. त्या उलट खासदार असतानाही इथल्या आमदाराने केली नाही, इतकी कामे करून दाखवली. मी एक महिला लोकप्रतिनिधी असल्यामुळे महिलांच्या समस्या जाणते.
इकडे पुरेसे रस्ते नसल्याने महिला शिक्षिका, महिला आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांना या दुर्गम भागात काय श्रम पडले ते आम्हाला माहित आहे. स्थानिक आदिवासी महिलांना बाळंतपण असो की मुलांचे आजारपण पायपीट करून आठ दहा किलोमीटर पायपीट करावे लागते. 35 वर्ष निवडून येणाऱ्या आमदारांनी यात बदल का केला नाही? याचा विचार करा. तुम्हाला सक्रिय आमदार हवा की मुंबईला निघून जाणारा निष्क्रिय आमदार हवा याचा निर्णय घ्या, आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा खरोखर विकास घडवण्यासाठी कायापालट घडवण्यासाठी आम्हाला संधी द्या; असे आवाहन अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी केले.
अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावपाड्यांना भेटी देत अपक्ष उमेदवार तथा माजी खासदार संसद रत्न डॉ. हिना गावित यांचे झंजावाती दौरे सध्या सुरू आहेत. त्या अंतर्गत चुलवड, सिसा, पाडली, अस्तंबा, पानबारी, तलाई, मोख बु, खर्डा आणि अन्य गावांमध्ये त्यांनी संपर्क दौरा केला.
यादरम्यान गावागावात घेतलेल्या कॉर्नर सभांमधून मतदारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मागील 35 वर्षात सातत्याने काँग्रेसचे आमदार इथून निवडून आले. परंतु या दुर्गम भागात ना रस्ते झाले ना वीज मिळाले ना कुठला विकास झाला. त्या उलट दहा वर्षांपूर्वी मी प्रथमच खासदार बनली त्यानंतरच्या काळात धडगाव आणि अक्कलकुवा झालेली विकास कामे बघा. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योग दिले रोजगार दिले.
शेतीपूरक व्यवसाय देऊन शेतकऱ्यांना आधार दिला. अनेक गाव पाड्यांमध्ये रस्ते बनवले जे पूर्वी कधी घडत नव्हतं. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे वाईट दिवस संपवायचे असतील तर आमच्या विकास कार्याला साथ द्या परिवर्तन घडवा; असे डॉ. हिना गावित यांनी आपल्या भाषणात सांगितले.