नंदुरबार l प्रतिनिधी-
आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले भव्य प्रशस्त क्रीडा संकुल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून या संकुलात उभारल्या जाणाऱ्या 70 व्यापारी गाळ्यां च्या बांधकामासह 26 कोटी 47 लक्ष रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या तालुका क्रिडा संकुलाच्या कामाचे भूमीपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते कालच पार पडले. नंदुरबार तालुका क्रिडा संकुलासाठी शासन धोरणाप्रमाणे पाच कोटी तर व्यापारी संकुलासाठी 20 कोटी 17 लाख 23 हजारांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. तथापि संकुल समितीने रु.१४२३.७८ लक्षचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे.
त्यामध्ये ७० व्यापारी गाळे व इतर खर्च समावेश आहे. यापुर्वी सादर केलेले व्यापारी गाळे ढोबळ अंदाजपत्रक रु. ७९३.०७ लक्ष मान्यता रद्द करुन रु.१४२३.७८ लक्ष अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. सदर क्रीडा संकुलाचे रु.२०१७.२३ वाढीव बाबीं पैकी रु.७९३.०७ लक्ष मान्यता रद्द करुन शिल्लक रु.१२२४.१६ लक्ष आणि सुधारीत अंदाजपत्रक रू. १४२३.७८ लक्ष असे एकूण रु.२६४७.९४ लक्ष अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. प्रथम टप्प्यातील रु.५००.०० लक्ष अंदाजपत्रकामध्ये सुरक्षा रक्षक कॅबीन, संरक्षण भिंत व मेन गेट, मुलां- मुलीकरीता स्वच्छता गृह, रेन वॉटर हार्वेस्टींग, सोलर रुफ, वॉटर सप्लाय, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, विविध खेळाचे मैदाने, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल इ.मैदाने, सी.सी.टी.व्ही., व इ. खर्च समावेश आहे.