नंदुरबार l प्रतिनिधी-
आदिवासी सांस्कृतिक संकुल बांधकामाला म्हणजे आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या उभारणीला आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे अखेरीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या दमदार कामगिरीमध्ये यामुळे भर पडली आहे.
जिल्हा निर्मितीपासून प्रतीक्षेत असलेल्या आणि आदिवासी संस्कृती संवर्धनात मोलाची भर घालू शकणाऱ्या आदिवासी सांस्कृतिक भवनाची उभारणी केली जावी, यासाठी नामदार डॉक्टर विजयकुमार गावित तसेच भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले व सुमारे 40 कोटी 17 लक्ष रुपयांच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली.
जिल्हा निर्मिती नंतर विविध प्रमुख इमारतींची उभारणी करण्याबरोबरच आदिवासी संस्कृती भवन उभारणीचे आश्वासन नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याच्यापूर्वी दिलेले होते त्याची पूर्तता प्रत्यक्षात होणार असल्यामुळे विविध आदिवासी संघटना आणि आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात आला.
दरम्यान याविषयी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, राज्यातील महत्वाच्या नवीन इमारतींच्या बांधकामाबाबत दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार सचिव समितीची बैठक पार पडली. यात नंदुरबार येथे सांस्कृतिक संकुल इमारतीचे बांधकाम करण्याकरिता रु.४०,१७,००,०००/- (अक्षरी रू. चाळीस कोटी सतरा लक्ष) इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तुत सांस्कृतिक संकुल इमारत बांधकामासाठी आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम व्यवस्थापन कक्षाव्दारे तरतूदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.